Skip to main content Skip to search

औदुंबर

अंकलखोप कृष्णातीरी । गुरु वसती औदुबरी ।

धन्य कृष्णातीर धन्य औदुंबर । जेये गुरुवर वसतसे ॥

 सांगली रस्त्यावर आष्टा या गावापासून ९ कि. मी. अंतरावर औदुंबर हे गाव आहे. सांगलीपासून २२ कि. मी. अंतरावर आहे. कृष्णेच्या तिरावर येथे दत्त मंदिर आहे. पलिकडील तीरावर भिलवडी हे गाव असून तेथील भुवनेश्वरी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंहसरस्वती स्वामी यांचा जन्म कारंजा येथे झाला. ८ व्या वर्षी उपनयन झाल्यावर ते वाराणसी येथे गेले. तेथून संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केले. तोपर्यंत त्यांची किर्ती चहूकडे पसरली होती. त्यामुळे त्यांना भेटायला, त्यांचे दर्शन घ्यायला हजारोंनी भक्तगण येत होते. असेच ते परळी वैजनाथ येथे आले. पण तेथेही भक्तांची रिघ लागली. तेव्हा ते तपस्येसाठी एकांत स्थळाचा शोध घेऊ लागले. कृष्णा नदीकाठी फिरत फिरत ते भिलवडी येथे आले. तेथे भुवनेश्वरी देवीचे त्यांनी दर्शन घेतले. सर्वत्र जंगल होते. कृष्णा नदीचा त्या किनाऱ्यावर डोह होता. तेथे सुसरींचा सुळसुळाट होता. त्यामुळे फारशी मनुष्यवस्ती नव्हती. नदीच्या दुसऱ्या तटावर त्यांनी एक औदुंबर वृक्ष पाहिला. त्यांना ती जागा आणि तिथला एकांत आवडला. त्यांनी तेथेच चातुर्मास करायचा ठरवला. अत्यंत रमणीय आणि निर्मनुष्य अशा त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्येला सुरुवात केली. त्यांच्या तप:साधनेमुळे त्या एकांत आणि गुढ ठिकाणी जणू सत्त्व शक्ती एकत्र झाल्या. चालत्या बोलत्या परमेश्वराचे अस्तित्त्व अनुभवून तो परिसर धन्य झाला. श्रीगुरुही अतिशय आनंदामध्ये होते. श्रीगुरु आपल्या साधनेमध्ये गुंग होते. कुणाचाही त्रास नव्हता. दैवी आनंदामध्ये दिवस चालले होते.

अंकलखोप कृष्णातीरी । गुरु वसती औदुबरी ।

धन्य कृष्णातीर धन्य औदुंबर । जेये गुरुवर वसतसे ॥

×
Get Callback ?