Skip to main content Skip to search

गाणगापूर

गाणगापूर(गुलबर्गा,कर्नाटक)-गाणगापूर हे क्षेत्रमनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्त्वयासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे.भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे.या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून,यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगलकारक केला आहे.या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे.दत्त भक्तांची अशी भावना आहे की,आज ही दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात.येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे.हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे फार महत्त्वपूर्ण आहे.मुंबई-हैद्राबाद(व्हाया सोलापूर) किंवा मुंबई-बंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते.तिथे उतरून बस किंवा ऑटोने २० किमी. अंतरावर गाणगापूर या क्षेत्रास जाता येते.बसमार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बससेवा आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.

श्रीदत्त संप्रदायातील सर्वात महत्वाचे आणि सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र गाणगापूर हे आहे. या ठिकाणी श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी २४ वर्षे म्हणजे दोन तपाहून अधिक काळ वास्तव केले. येथूनच मग ते अवतार समाप्तीसाठी श्रीशैल्यकडे गेले. श्रीगुरूंच्या अवतार कार्यातील अत्यंत वैभवाचा काळ गाणगापूर येथे गेला. त्यांनी येथे असंख्य लीला घडवल्या. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी रोकडी प्रचिती आणून दिली. या सर्वांमुळे श्रीक्षेत्र गाणगापूर हे भूतलावरील अत्यंत प्रख्यात असे तीर्थक्षेत्र बनले आहे. नृसिंहवाडी येथे श्रीगुरुंच्या लीला सर्वत्र पसरल्या. त्यांना भेटायला झुंडींने लोक येवू लाघले. तेव्हा तिथे मनोहर पादूका स्थापन करून त्यांनी पुढे प्रयाण केले. फिरत फिरत ते भीमा अमरजा संगमावर आले. त्याकाळी या नगराला गंधर्वनगरी या नावाने ओळखत होते. भीमा अमरजा संगम परिसरामध्ये त्यावेळी जंगल होते. अतिशय शांत आणि एकांत असा तो परिसर होता. श्रीगुरूंनी तेथे प्रदीर्घ अनुष्ठान केले. संगमावर त्यांनी असंख्य भक्तांना दर्शन दिले. गाणगापूर येथील भक्तांना अत्यंत प्रिय स्थान म्हणजे श्रीगुरूंचा मठ अथवा निर्गुण पादुका मंदिर हे होय. या मठाचे स्वरूप मंदिरासारखे नसून मोठ्या धाब्याच्या घरासारखे आहे. पूर्वेस व पश्चिमेस मठास महाद्वारे आहेत. पश्चिमद्वारावर नगारखाना आहे. मठाच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औंदुबर, त्याखाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्चिमेस अश्वत्थ वृक्ष आहे. या वृक्षाच्या भोवती नागनाथ, मारूती व तूळशीवृंदावन आहे. मठाभोवतीच्या ओवऱ्यांत सेवेकरी व साधक अनुष्ठानास बसतात. मठाच्या दक्षिणभागात उत्तराभिमुख असा श्रीगुरुपादुकांचा गाभारा असून त्याच्या समोर उत्तम फरशी केलेला सभामंडप आहे. गाभाऱ्याच्या उजव्या हाताला दरवाजा आहे. येथून आत गेल्यावर गाभारा पश्चिमाभिमुख असल्याचे ध्यानात येते. तेथून एका कोनाड्यात चिंतामणीची वालुकामय मूर्ती स्वत: नृसिंहसरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशाच्या बाजूस पश्चिमाभिमूख अशा दारातून ओणवे होवून प्रवेश करता येतो. लहानशा झरोक्यातून डोकावल्यावर पश्चिमाभिमुख अवस्थेत आसनस्थ अशा त्रिमूर्तीचे मनोहर दर्शन घडते. या आसनावरच श्रीगुरूंच्या पादुका ठेवलेल्या असून त्यांना “निर्गुण पादुका” असे म्हणतात. या पादुका शिळेवर कोरलेल्या नसून सुट्या आहेत. या निर्गुण पादुका चांदीच्या पत्राने मढविलेल्या असून पेटीत बंद करून ठेवलेल्या असतात. कोणासही त्यांना स्पर्श करता येत नाही. श्रीगुरूंच्या पूजेतील बाण, दहा शाळीग्राम, तीन स्फटीकांचे लिंग यांचाही निवास येथे आहे. निर्गुण पादुकांत दत्तात्रेयांचे वास्तव्य असते. अनेकांना यासंबंधीचा साक्षात्कार झालेला आहे. श्रीगुरु देहातीत, गुणरुपातीत होऊन निर्गुणस्वरुप बनले म्हणून या पादुकांना ‘ निर्गुण पादुका ’ असे नाव मिळालेले आहे. गाणगापूरच्या नैऋत्य दिशेला २ कि.मी. वर भीमा व अमरजा यांचे संगमस्थान आहे. भागीरथीकुंडापासून दोन फर्लांगावर श्रीगुरुंचे विश्रांतीस्थान आहे. भक्त पर्वतेश्वर याच्या शेतात हे स्थान असून या शेतकऱ्याची कथा गुरूचरित्राच्या ४७ व्या अध्यायात आलेली आहे. संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. श्रीगुरूंच्या अनुष्ठान स्थानाच्या पूर्वेस उत्तरवाहिनी भीमा व दक्षिणेस पूर्ववाहिनी अमरजा या दोन नद्यांचा संगम आग्नेय दिशेस झाला आहे. पश्चिमेस अनादी संगमेश्वराचे देवालय आहे. श्रीगुरूंच्या अनुष्ठान स्थानावर एक मंदिर असून तेथील अश्वत्थ वृक्षाखाली पादुकांची स्थापना केली आहे. भीमातीरावर नरहरी ब्राह्मणास कुष्ठरोग परिहारासाठी औदुंबराचे एक काष्ठ पल्लवित होईपर्यंत सेवा करण्याची आज्ञा श्रीगुरुंनी त्याला केली होती. तो औदुंबर वृक्ष आज तेथे नसला तरी तेथील पादुका अश्वत्थ वृक्षाखाली स्थापन झाल्या आहेत. याशिवाय तेथे अष्टतीर्थे आहेत,

त्यांची नावे पुढीलप्रमाणे

१. षट्कुलतीर्थ

२. नरसिंहतीर्थ

३. भागीरथीतीर्थ

४. पापविनाशी तीर्थ

५. कोटितीर्थ

६. रुद्र्पादतीर्थ

७. चक्रतीर्थ

८. मन्मथतीर्थ.

×
Get Callback ?