Skip to main content Skip to search

कुरवपूर चा इतिहास

 श्रीक्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा प्रथम अवतार होय. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पीठापूर येथे झाला. वयाची सोळा वर्षे झाल्यानंतर ते पीठापूर येथून निघाले. त्यांनी गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी वस्तव्य केले. त्यानंतर संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते या ठिकाणी होते. त्यांच्या अनेक लीला या ठिकाणी घडल्या आहेत. प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचा शोध लावला. येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादूका असून प.प. टेंबेस्वामींची गुहा आहे. या गुहेमध्ये प.पू. श्रीधर स्वामींनी देखिल वास्तव्य केले होते. कुरवपूर याच ठिकाणी प.प. टेंबेस्वामींनी सर्वसामान्य आबालवृद्धांना संकटातून मुक्त करणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली आहे. त्यांनी येथे एक चातुर्मास केला होता. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी तपश्चर्या केली आहे.

          कुरवपूर अथवा कुरुगड्डी हे रायचूर तालुक्यांतील एक खेडे. हे खेडे कर्नाटक आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागांत ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला आहे . तेथे एका बेटावर आहे. या बेटाच्या जवळ कृष्णा नदीच्या प्रवाहांत आणखी काही बेटे आहेत. उदाहरणार्थ – जितामित्रबेट, नारगड्डि ( नारबेट ) आणि कुरुगड्डि. या प्रत्येक बेटात एक एक देवता आहेत. कुरुगड्डिच्या जवळ एक अग्रहार नावाचे जे खेडे आहे तेथे श्रीपादस्वामी राहात असत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कुरवपूर येथील लीला विलक्षण आहेत. कुरवपूर येथील एका विद्वान ब्राह्मणाच्या पोटी एक महामूर्ख मुलगा जन्मला होता. पण त्याला कोणतीच विद्या प्राप्त झाली नाही त्याला सुधारण्यासाठी बापाने खूप प्रयत्न केले, पण व्यर्थ. आपल्या प्रयत्नांत अपयशी होऊन एके दिवशी बापाने इहलोकची यात्रा संपविली. त्या मुर्ख मुलाला सांभाळता सांभाळता आईला जीव नकोसा झाला. कितीही प्रयत्न केले तरी त्याला थोडी सुद्धा विद्या प्राप्त होत नसे. “ आता मी काय करू ? ” म्हणून एके दिवशी त्याने गावातील लोकांना विचारिले तेव्हा त्यांनी ‘ मरून जा ’ म्हणून चेष्टा केली. लोकांचे म्हणणे ऎकून त्याने तसेच आईला जाऊन सांगितले. “ तुझ्या बरोबर मीही येते ” आई म्हणाली या प्रमाणे दोघेही जीव देण्यासाठी कृष्णा नदीकडे भर दिवसा निघाले. नदीला पोहचताच त्यांना श्रीपादस्वामी दिसले. त्यांच्या दर्शनाला गेले आणि आपली सगळी हकीकत सांगून “आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नसल्याने आपण आत्महत्या करीत आहोत; तेव्हा आपल्याला आत्महत्येचा दोष लागू नये म्हणून आपल्या दर्शनाला आलो आहोत. आता आपले दर्शन झाले. आत्महत्येला परवानगी मिळावी” म्हणून विनंति केली. श्रीपादस्वामींनी त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले; त्यांनी मूर्ख मुलाकडे आपली कृपादृष्टि फिरविली आणि त्याच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेविला. लगेच तो मुर्ख मुलगा वेदशास्त्र संपन्न झाला. ही महदाश्चर्याची घटना घडताच आई व मुलगा स्वामींना शरण गेले. नंतर त्या स्त्रीने “पुढच्या जन्मी आपल्या सारखे ज्ञानी पुत्र व्हावे” म्हणून प्रार्थना केली तेव्हा तिला स्वामींनी शनिप्रदोषाचे व्रत व त्याचा महिमा समजाऊन सांगून “जर तू या व्रताचे चांगल्या प्रकारे पालन केल्यास मीच तुझा पुत्र होईन” म्हणून वचन दिले.

        कुरवपुरला अग्रहार असे म्हणत असत. कर्नाटकामध्ये रायचूर जवळ कुरवपूर हे ठिकाण असून रायचूर हैद्राबाद रस्त्यावर मत्कल गावाजवळून कुरवपुर फाटा लागतो. तेथून पंचपहाड या ठिकाणी यावे लागते. तेथून नावेने कुरवपूर याठिकाणी जाता येते. त्याला स्थानिक भाषेत कुरगड्डि असे म्हणतात. कुरवपुरचे मंदिर एखाद्या बंदिस्त गढीसारखे असून तेथे आता राहण्यासाठी धर्मशाळा उपलब्ध आहेत. आधी सांगितले असता भोजनाची व्यवस्था होवू शकते. मंदिराच्या बाजूला काही अंतराअर एक प्राचीन वटवृक्ष आहे. तेथे गुरुचरित्र पारायण करता येते. तेथेच थोडे पुढे प.प. टेंबेस्वामींची गुहा आहे. तेथेही एक धर्मशाळा आहे.

×
Get Callback ?