Skip to main content Skip to search

कर्दळीवन ची माहिती

prakatsthan

भिऊ नका पाठीशी तुमच्या,आहे मी लेकरा |
उदंड तुम्ही लेकरं माझी,स्वामी मी तुमचा ||
श्री शैल्यच्या कर्दळी वनात,भंग होऊनी समाधी माझी |
प्रगटलों मी वारुळातुन,निघालो देशोटनासाठी ||

कर्दळीवन” हा शब्द उच्चारताच सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यासमोर उभी राहते ती स्वामी समर्थांची प्रतिमा. कारण याच कर्दळीवनात श्रीनरसिंह सरस्वती गुप्त झाले आणि याचा वनात श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले. यापूर्वी स्वामी समर्थांच्या चरित्रात कर्दळीवनाचा उल्लेख आपल्या वाचनात आला असेल. कर्दळीवनाचा उल्लेख अनेक पौराणिक व  आध्यात्मिक ग्रंथांमधून आढळतो.

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याबाबत एक कथा प्रचलित आहे. त्यानुसार श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्रीनरसिंह सरस्वती शके १३८१ मध्ये कर्दळीवनातील नीरव शांतता, उंचच वृक्ष असलेल्या निबिड अरण्यातील एका गुहेजवळ, जेथे वटवृक्ष-औदुंबर-अश्र्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढवले आहेत, अशा ठिकाणी ध्यानस्थ बसले. तशा अवस्थेत ते तीनशेपेक्षा अधिक वर्ष होते. त्यांच्या शरीराभोवती भलेमोठे वारुळ तयार झाले होते. एक दिवशी एक आदिवासी लाकूड तोडण्यासाठी म्हणून आला व स्वामी ध्यानस्थ बसलेल्या ठिकाणाजवळील वृक्षावर घाव घातला. तो घाव चुकून श्रीनरसिंह सरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. त्यामुळे अर्थात त्यांची समाधी भंग पावली. ते वारुळातून बाहेर आले. त्यांचे विलक्षण तेजस्वी रूप पाहून तो आदिवासी घाबरून त्यांची क्षमा मागू लागला. हेच ते दत्तत्रेयांचे तिसरे अवतार श्रीस्वामी समर्थ ! भारतभर तीर्थाटने करीत अक्कलकोटला भक्तांच्या उद्धारासाठी ते स्थायिक झाले. येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे.

अक्कलकोट हे क्षेत्र दत्तसंप्रदायांमध्ये विशेष महत्वाचे मानले जाते.

कर्दळीवन बद्दल लोकांच्या मनात पडणारे प्रश्न :

श्री स्वामी समर्थांचे प्रकटस्थान कसे असेल?
काय आहे त्या वनात ?
मला जाता येईल का तिथे ?
खूप अवघड तर नसेल ना ?
मला चालण्याची सवय नसताना त्या डोंगरदऱ्यातून,जंगलातून चालणे होईल का ?
वन्य व हिंस्र प्राण्यांचा त्रास होतो का ?

यांसारखे अनेक प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसांना पडतात. म्हणूनच माणसांना अनुभवसिद्ध उत्तरे मिळवीत, मनातील शंका व भीती नाहीशी व्हावी आणि परिणामी कर्दळीवनाची यात्रा आपणाकडून घडावी यासाठी ह्या माहितीपत्रिकेचा प्रपंच !

  • कर्दळीवन बद्दल भौगोलिक माहिती:

आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील नंदीकोटकूर या तालुक्यात कर्दळीवन वसलेले आहे. श्रीशैल्य व कर्दळीवन ही पवित्र ठिकाणं आहेत. श्रीशैल्य बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. श्री महादेव मल्लिकार्जुन आणि श्रीभ्रमरांबादेवी यांचे स्थान. श्रीशैल्यचा साधारण ८० किलोमीटरचा परिसर घनदाट जंगल, उंच डोंगर आणि दऱ्यांनी व्यापलेला आहे. श्रीशैल्य मंदिराच्या उत्तरेस कृष्णा, भीमा, तुंगभद्रा, भोगावती, शिवा आणि कुंभी या सहा नद्यांचे पाणी अडवून त्यावर १२५ मीटर उंचीचे भव्य दगडी नागार्जुनसागर धरण बांधले आहे. यांतील कृष्णा नदीला तिच्या विशाल आणि अति खोल पात्रामुळे पाताळगंगा म्हणत असावेत.

हैद्राबाद ते श्रीशैल्य यातील अंतर २१२ कि.मी.चे आहे. हैद्राबादहून श्रीशैल्यला बसने जाता येते. बसने गेल्यास साधारणपणे सहा तास लागतात. श्रीशैल्य पासून कर्दळीवनाकडे जाण्यासाठी पातळगंगेच्या पात्रापर्यंत रिक्षाने जाऊ शकतो. देव मल्लिकार्जुन मंदिरापासून पाताळगंगा घाट हा साधारण २ कि.मी. अंतरावर आहे. तेथे ६५० पायऱ्या उतरून खाली जावे लागते. आता रोप-वे नेसुद्धा जाता येते. पातळगंगेत उतरताना आपल्याला समोर तीन विशाल पर्वत दिसतात. पूर्वेस ब्रम्हगिरी, पश्चिमेस शिवगिरी, दक्षिणेस विष्णुगिरी हे पर्वत जणू ब्रम्हा, विष्णू, महेश उभे असल्यासारखे भासतात. पात्राजवळच एक दत्त मंदिर आहे. महाशिवरात्रीला  आणि त्यानंतर महिनाभराने येणाऱ्या उगडी या नववर्षाच्या दिवशी हजारो शिवभक्त, साधू, संन्यासी पातळगंगेच्या पात्रात स्नानासाठी येत असतात. याचा पातळगंगेच्या पात्रातून नावेने प्रवास करीत आपण कर्दळीवनाकडे प्रस्थान करतो.

कर्दळीवन प्रवासाचा पहिला टप्पा : पाताळगंगेचा किनारा ते अक्कमहादेवी मंदिर

पातळगंगेच्या किनाऱ्यापासून कर्दळीवनात प्रवेशासाठीचा व्यंकटेश किनारा हे अंतर २४ कि.मी चे आहे. त्यासाठी बोटीने प्रवास केल्यास एक ते दीड तास लागतो. मात्र त्यासाठी कमीत कमी २० लोकांचा ग्रुप असणे आवश्यक असते. व्यंकटेश किनाऱ्याला जाताना वाटेत अक्कमहादेवीचे मंदिर लागते. हे मंदिर म्हणजे एक गुहाच आहे. या गुहेला प्रचंड अशा मोठ्या दगडांचे नैसर्गिक असे संरक्षण मिळालेले आहे. या गुहे बाहेर श्री अक्कमहादेवीची सुबक मूर्ती आहे. ही दगडी गुहा साधारणपणे ४०० मी. असावी. गुहेत अंतर्भागात पूर्ण काळोख आहे. त्यामुळे उजेडाची अत्यंत आवश्यकता भासते. गुहेत प्रवेश केल्यावर पुढील रस्ता अरुंद होत जातो. काही अंतर तर गुडघ्यावर बसून जावं लागत. पुढे गेल्यावर एक स्वयंभू शिवलिंग आहे. इथे फक्त एकावेळी एका व्यक्ती,तेही गुडघ्यावर बसूनच दर्शन घेत येऊ शकते. गुहा अरुंद व खोल असल्यामुळे श्वास घेणे अवघड होते. शिवलिंगाचे दर्शन घेऊन तसेच बाहेर पडता येते. गुहेच्या वरच्या बाजूला श्रीगणेशऋषी यांचे मंदिर आहे.

अक्कमहादेवी मंदिराकडून आपण व्यंकटेश किनाऱ्याला जाण्यास निघतो.किनाऱ्यावर उतरल्यावर श्री अप्पारावस्वामी यांचा आश्रम आहे. या आश्रमातील मोकळ्या जागेत मुक्काम करता येतो.व्यंकटेश किनाऱ्यापासून कर्दळीवनात प्रवेश करण्याकरीता पायी प्रवास करावा लागतो.

कर्दळीवन प्रवासाचा दुसरा टप्पा : “व्यंकटेश किनारा ते अक्कमहादेवीची गुहा”

व्यंकटेश किनारा ते अक्कमहादेवीची गुहा हा साधारण ९ कि.मी. रस्ता उभी चढण असेलेला आहे. त्यासाठी सहा डोंगर चढून जावे लागतात. पहिल्या डोंगराची चढण थोडी दमवणारी आहे. पण हे डोंगर चढून पलीकडे उतरणे असा प्रवास नाही तर डोंगराच्या एका बाजूने चालत जावे लागते. त्यानंतर येणारे सपाट मैदान चालून गेल्यावर रस्त्यात “स्वामी समर्थांचे पाऊल” एका दगडावर उमटलेले दिसते.त्यापुढे अक्कमहादेवीची गुहा लागते.अक्कमहादेवीची ही गुहा संपूर्ण दगडात आहे. गुहेमध्ये अक्कमहादेवी आणि श्रीनरसिंह सरस्वती स्वामी  यांच्या मूर्ती असून एक शिवलिंग आहे. या गुहेत फार फार तर १५० ते २०० लोक राहू शकतात. गुहेच्या बाहेर १२ ही महिने नैसर्गिक पाण्याचा झरा आहे. याच गुहेमध्ये शिवभक्त अक्कामहादेवी यांनी तपश्चर्या केली होती.

कर्दळीवन प्रवासाचा तिसरा टप्पा : “अक्कमहादेवी गुहा ते स्वामींचे प्रकटस्थान”

हा साधारण ५-६ कि.मी. रस्ता सरळ सपाट भागावरून चालण्याचा आहे. काहीशी दाट झाडी, अरुंद वाट पाण्याचा छोट्या ओढ्याशेजारून जाते. असा हा प्रवास आहे.रस्त्यामध्ये मोठमोठी वारुळे, बाबूंची झुडपे, चिखलातून आणि पाण्यातून जाणारी पायवाट असा काहीसा हा प्रवास करत स्वामींचे प्रकटस्थान असलेल्या गुहेपाशी पोहचता येते. या प्रकाटस्थानाचे माहात्म्य म्हणजे या ठिकाणी औदुंबर, वड व पिंपळ हे तिन्ही गगनचुंबी वृक्ष एकमेकांना चिटकून उभे आहेत. स्वामींच्या गुहेमध्ये शिवलिंग, स्वामी समर्थ व श्रीनरसिंह सरस्वती यांच्या प्रतिमा आहेत. तिथे ध्यानधारणा करणे, जप करणे किवा पठण करणे फारच मंगलदायी वाटते.

कर्दळीवन प्रवासाचा चवथा टप्पा : “स्वामींचे प्रकटस्थान ते बिल्ववन” 

स्वामींच्या प्रकटस्थानापासून सुरु होणारा रस्ता बिल्ववनाला मिळतो. हा अरुंद वाटेने करावा लागणारा ४ कि.मी.चा प्रवास ओढ्याच्या प्रवाहाबरोबर वाटेने चिखल, पाणी ओलांडत करावा लागतो. हा पाण्याचा प्रवाह पुढे पातळगंगेमध्ये मोठ्या धबधब्याच्या रुपात कोसळतो. या ठिकाणाला “बिल्ववन” म्हणतात. या बिल्ववनातल्या धबधब्याच्या डाव्या बाजूला मार्कडेय ऋषींना महादेवाचे दर्शन झाले होते.

कर्दळीवन प्रवासाचा पाचवा टप्पा :”बिल्ववन ते व्यंकटेश किनारा (पाताळगंगा)”

बिल्ववन दर्शन झाले कि परत परतीच्या प्रवासाला लागायचे.बिल्ववनातून परत अक्कमहादेवीच्या गुहेत थोडा वेळ विश्रांती करून परत व्यंकटेश किनारा करून पाताळगंगेच्या किनाऱ्याला यायला निघायचे.

  • कर्दळीवनात जाण्यापूर्वी श्रीशैल्यमच्या परिसरात पाहता येथी अशी रम्य ठिकाणे :

१. श्री मल्लिकार्जुन व श्रीभ्रमरांबादेवी मंदिर
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री महादेव, श्री मल्लिकार्जुन आणि पार्वती मातेच्या अठरा शक्तीपीठापैक्की श्रीभ्रमरांबादेवी माता या दोघांचे एकाच ठिकाणी वास्तव्य असलेले हे एक महाक्षेत्र.
मल्लिकार्जुनाचे भव्य-दिव्य मंदिर असून त्या मंदिराच्या बाहेरून वीस फूट उंचीची भिंत आहे. ती तटबंदी स्वरुपाची भिंत उत्कृष्ठ शिल्पकाम केलेली आहे. त्या भिंतीवर शिवतांडव, पार्वती कल्याण, त्रिपुरासूर वध, तारकासूर वध, शिव तपभंग, सागर मंथन अशी शिल्पे कोरलेली आहेत.मंदिराच्या चारही बाजूंनी चार गोपुरे आहेत. त्यांतील पूर्व दिशेतील गोपुर विजयनगरच्या हरिहरराय तर उत्तर दिशेचे गोपूर १६६७ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले. या उत्तर दिशेच्या गोपुरास शिवाजी गोपुर असे म्हणतात.

२.साक्षी गणपती  मंदिर

मल्लिकार्जुन मंदिरापासून २ किमी अंतरावर साक्षी गणपती आहे.श्रीशैल्यानी भक्तास दर्शन दिल्याची साक्ष दिल्यामुळे यास साक्षी गणपती असे म्हणतात.

३.पंचधारा
साक्षी गणपतीच्या मंदिरापासून पंचधारा हे १ किमी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी पायऱ्यांची सुविधा आहे. येथे एकाच जागी पाच पाण्याच्या धारा पूर्वी असाव्यात. आता पंचधारा एकाच धारेच्या रुपात निरंतर वाहत असते.

४.शिखरेश्वर  मंदिर

श्री.शैल्यम पासून आठ किमी अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या कळसावर एक नंदी आहे. नंदीच्या शिंगावर मध्यातून खालच्या दिशेकडे पाहिल्यानंतर श्रीशैल्य मंदिराच्या कळसाचे दर्शन होते.

५.मल्लम्माचे अश्रु
मूळ मंदिराच्या मागे काही अंतरावर नंदीमठाच्या शेजारी मल्लम्माची गोशाळा व मल्लम्माचे शिल्प आहे. त्या शिल्पापासून निरंतर पाणी वाहत आहे. त्यास भक्तगण मल्लम्माचे अश्रु म्हणतात.
कर्दळीवनात एक अध्यात्मिक अनुभूती, एक परमोच्च आनंद आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेची प्रचिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत.

 

               गिरनार ची माहिती                                                                                       पिठापूर-कुरवपूर ची माहिती  

×
Get Callback ?