Skip to main content Skip to search

माणगाव

कोकणातील सावंतवाडी संस्थानातील माणगांवातील श्री. गणेशभटजी टेंब्ये व सौ. रमाबाई यांच्या पोटी शके १७७६ श्रावण कृष्ण पंचमीस रविवार दि. १३ ऑगस्ट १८५४ रोजी श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म झाला. वयाच्या ८ व्या वर्षी मुंज झाली. त्यानंतर ते त्रिकाल संध्या, नित्य पंचयज्ञ, श्री गुरुचरित्र वाचन करीत असत. कोरी भिक्षा मागून स्वत: स्वयंपाक करुन वैश्वदैव, पंचयज्ञ – नैवैद्य करुन भोजन करत असत. नित्य आन्हिक करु लागले. त्याचबरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषाभ्यास तसेच अष्टांग योगाभ्यासही सुरु केला. आपल्या मंत्रसिद्धीच्या सहाय्याने आणि उपाय सांगून त्यांनी अनेकांच्या भूतबाधा सोडवल्या. अनेकांना पिडामुक्त केले व अनेक भक्तांना उपासना देऊन सन्मार्गी लावले.

          त्यांनी गायत्री पुरश्चरण केले. एकदा स्वप्नदृष्टांतानुसार नृसिंहवाडीला गेले असता तेथे श्री प. प. गोविंदस्वामी या ब्रह्मज्ञानी संन्यासाचा कृपानुग्रह होऊन श्री दत्तसंप्रदायाची दीक्षा आणि गुरुमंत्र वासुदेवशास्त्रींना लाभला. या नंतर इ. स. १८८३ वैशाख शुद्ध पंचमी कागलहून आणलेल्या श्री दत्तमूर्तीची सात दिवसात मातीने बांधलेल्या मंदिरात माणगावी त्यांनी स्थापना केली. साक्षात दत्तप्रभू या मंदिरात राहिले. सात वर्षाच्या कालावधीत श्री दत्तप्रभूंनी येथे विविध लिला केल्या. मंदिर भरभराटीला आले. दर गुरुवारी व शनिवारी प्रचंड गर्दी होत असे.

त्यांनी श्रीदत्ताज्ञेने “ उत्तरेस जा ” या आज्ञेवरुन कोल्हापूर , औदुंबर, पंढरपूर , बार्शी अशी तीर्थक्षेत्रे केली. यानंतर भारतात विविध ठिकाणी त्यांचा अनवाणी पायी प्रवास झाला. या काळात २३ चातुर्मास पूर्ण केले. विविध ग्रंथांची, स्तोत्रांची, आरती व्रतवैकल्ये, पदे आदिंची श्री दत्त महाराजांच्या कृपेने निर्मिती झाली. असे हे स्वामी महाराज संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती, आयुष्यभर सगुणोपासना करणारे, उत्तम वैद्य, मंत्रसिद्धी, यंत्रतंत्र सिद्धियुक्त, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत अध्यात्मिक साहित्य निर्मितीकार, प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी, उत्कृष्ट वक्ता, सिध्द हठयोगी व उत्कट दत्तभक्त होते.

 श्री दत्तसंप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य (श्री. प. प.) वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे (थोरले महाराज) कर्तृत्व व स्थान मोठे आहे. थोरल्या महाराजांनी श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान पिठापूर ( आंध्रप्रदेश ) आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने, तसेच श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्री. नृसिंहसरस्वती यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खूले केले. प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी “ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” हा महामंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. त्याच बरोबर प्रमुख अशा श्रीदत्त स्थानामधील नित्य दिनचर्या देखील स्वामी महाराजांनी ठरवून दिली अशा महाराजांचे जन्मगाव हे माणगाव होय.

×
Get Callback ?