Skip to main content Skip to search

माणिकनगर

माणिकनगर(बिदर,कर्नाटक)-सोलापूर-हैद्राबाद बसमार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून १ किमी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे.कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते.सकलमत
संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे.रामनवमीच्या दिवशी सव्यं सद्गुरु दत्तप्रभुंनी बयाबाईंना(माणिकप्रभूंची आई)दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेइल असा आशिर्वाद दिला.२२ डिसेंबर १८१७ साली(मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी)दत्त जयंतीच्या दिवशी बसव कल्य़ाण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला.माणिक नगर,बसवकल्य़ाण ,बिदर या परिसरामध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला केल्या आहेत.त्यापैकी एक म्हणजे ज्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूरला वास्तव्यास असतांना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले आणि त्याच वेळी ते देह रूपाने गाणगापूरला सुध्दा होते.त्याचप्रमाणे श्री माणिक प्रभूजी बिदर जवळील झरणी नृसिंह येथे मुक्कामास असतांना त्यांच्या अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भोजनास गेले आणि त्याच वेळी ते देहरूपाने झरणी येथे देह रूपाने गाढ निद्रा घेत होते.त्यांचे एक वैशिष्टय होते की,त्यांच्या दरवाज्यातून कधीही कुणीही विमुख गेले नाही. शिर्डीचे साईबाबा सुध्दा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते.श्री माणिकप्रभूजी हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन होते.त्यांचा एकमेकांचा आपसात परिचय होता.त्यांच्या नेहमी भेटी होत असत.श्री माणिक प्रभूंनी सकलसंत संप्रदायाची स्थापना करुन १९व्या शतकाच्या मध्यकाळामध्ये या महान देशाच्या मध्यकाळामध्ये एका मुसलमान अधिराज्यामधे (तत्कालीन,निजाम इलाका)हिंदी समाजाच्या एकात्मतेचा प्रयोग यशस्वी करुन आम्हापुढे एक आदर्श ठेवला.पुढे श्री रामकृष्ण परमहंसांनी याच तत्वाचा उद्घोष केला व महात्मा गांधीनीही हेच तत्व अंगीकारून आपली राष्ट्रीय ऎक्याची इमारत रचली.हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की,ज्याठिकाणी आजही गादी परंपरा सुरु आहे.माणिक प्रभू संस्थान आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे.अंधशाळा,वेदपाठ शाळा,पब्लिक स्कूल,संगीत विद्यालय,संस्कृत पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिक प्रभू संस्थान राबवित असून त्याद्वारे समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगिण विकास केला जातो.असे दत्त अवतारी पुरुष मार्गशीर्ष शुध्द एकादशी सन १८६५ मध्ये माणिकनगर येथे संजीवन समाधीमध्ये लीन झाले.हे क्षेत्र सोलापूर पासून १४० किमी अंतरावर आहे.गुलबर्गा-बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून हुमानाबादसाठी
(माणिकनगरसाठी)नियमित बससेवा आहे.बीदर पासून ४० किमी आणि गुलबर्गापासून ६५ किमी
अंतरावर हुमनाबाद (माणिकनगर)आहे.

×
Get Callback ?