Skip to main content Skip to search

मुरगोड

चिदंबरेश्वर मूल पीठ मूल महाक्षेत्र संस्थान, केंगेरी मुरगोड

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यामधील मुरगोड गावापासून दोन फर्लांग अंतरावर आहे. बेळगाव पासून ५० कि. मी. अंतरावर ही पुण्यभूमी स्थित आहे.

मुरगोड गावाच्या उत्तरेस हे क्षेत्र आहे. आजुबाजूला डोंगर आहेत. त्या डोंगरातील पाणी वाहून एकीकडे साठते. त्या साठलेल्या पाण्याचे एक तळे निर्माण झाले आहे. त्या तळ्याच्या पाण्याचा रंग लाल असल्याने या क्षेत्राला केंगेरी म्हणून ओळखले जाते. यालाच अरुणतटाक म्हणून पण ओळखले जाते. तळ्याच्या पश्चिमेस एक विहीर आहे. या क्षेत्राच्या महाद्वारातून आत आल्या नंतर एक विलक्षण आनंद व समाधान मिळते. समोर सभा मंडप दिसतो. ह्याला लागूनच एक कट्टा आहे. श्री चिदंबर महास्वामींचे पिता प्रकांड पंडित प. प. श्री मार्तांडदिक्षित यांनी तपश्चर्या केलेली जागा ही आहे. येथे परम पवित्र असा औदुंबर वृक्ष आहे. या औदुंबर वृक्षाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालणारा धन्य होतो व त्याची मनोरथे पूर्ण होतात. याच वृक्षातून श्री चिदंबर महास्वामींनी सुवर्ण नाण्यांची वृष्टी केली होती. त्याच्या दक्षिण दिशेस मातोश्री लक्ष्मी माता मंदिर आहे. औदुंबर कट्ट्याच्या उत्तरेस श्री चिदंबर महास्वामींचे मंदिर आहे. महास्वामींच्या समोर एक सुंदर नदी आहे. हे मंदिर तीन भागांमध्ये विभागले आहे. गाभारा, मध्यभाग (नदी मंडप) आणि पूर्वभाग. मंदिराच्या उत्तरभागात श्रीराम मंदिर आणि चिदंबर महास्वामींनी स्थापन केलेले मार्तंडेश्वर मंदिर आहे. याच मंदिरामध्ये महास्वामींनी स्थापन केलेला जागृत मारुती आहे. या मंदिरासमोर यज्ञमंडप, येथे दरवर्षी शैवागमोक्त महोत्सवाचे आयोजन होत असते. याच्या उत्तर दिशेला अन्नछत्र आहे. येथे रोज भक्तांना अन्न संतर्पण होत असते.

          श्री चिदंबर महास्वामींच्या मंदिरासमोर एक मोठा अश्वथ वृक्ष आहे. “ वृक्षाणानां अश्वत्थ ” असे भगवान श्रीकृष्णाच्या वचनाप्रमाणे हा वृक्ष पवित्र आहे. येथे श्री दत्त पादुका आहेत. श्री चिदंबर महास्वामींचे पिता श्री मार्तंड दिक्षित यांनी शके १६८५ साली आपल्या तपोनुष्ठानाकरिता या श्री दत्त पादुका स्थापन केल्या. या मंदिराला पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर असे दोन दरवाजे आहेत. पूर्व दरवाज्याकडून पाहिले असता श्रींचे दर्शन घडते. श्री चिदंबर महास्वामींचे ज्येष्ठ पुत्र श्री दिवाकर दिक्षित यांनी वैनयाग केलेला तो कट्टा. त्यामध्ये ३३ कोटी देवदेवतांचा वास असल्याची प्रचिती आहे. दिवाकर कट्ट्यापासून थोड्याशा अंतरावर बनशंकरी मंदिर आहे. एक बिल्ब वृक्ष आहे. श्री चिदंबर महास्वामींच्या मंदिराच्या ईशान्य भागात पीठाधिकारांचा वाडा आहे.

          श्री चिदंबर लिंग अत्यंत निर्मळ असून त्यावर नर्मदा बाण आहे. स्कंद, शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की , गंगेमध्ये ३ दिवस, यमुनेमध्ये ७ दिवस स्नान केल्याने मोक्ष मिळतो पण नर्मदा नदीच्या दर्शनाने मोक्ष मिळतो. म्हणून भगवान शंकरांनी स्वत: सांगितले आहे की, पवित्र नर्मदा नदीच्या बाणामध्ये श्री चिदंबर प्रभू विराजमान आहेत. शैवागमोक्त उत्सवाचे वेळी चिदंबर लिंगामधून एक ज्योती दिसते. परमेश्वर ज्ञानस्वरुप आणि ज्योतीस्वरुप आहेत. महोत्सवाचे मध्यान्हे क्षणोश्च ज्योती दर्शन – अशी अद्भुत लीला दरवर्षी चंपाषष्ठीच्या दिवशी घडून येते. श्री क्षेत्र केंगेरीमध्ये श्री चिदंबर महास्वामींच्या मूळ पादुका आहेत. श्री चिदंबर महास्वामींनी स्वत: राजारामांना माझे प्रितीचे स्थान केंगेरी, असे स्पष्ट सांगितले. अशा पुण्य भूमी केंगेरी कडे एकदा वळून पाहिले तर जीवन धन्य होते. श्रीक्षेत्र केंगेरीला दिलेली एक कवडी सुद्धा कैलासास पोचते. स्वत: भगवान शंकर सांगतात की काशी मध्ये न दिसणारा केंगेरीमध्ये दिसतो. ३३ कोटी देवदेवता चिदंबर महास्वामी दर्शन आणि पूजेसाठी रोज मध्यरात्री येतात असे संत विठाबाई म्हणतात आणि हे सत्य आहे. अजूनी सुद्धा हे घडत असल्याचा कित्येक जणांना अनुभव आला आहे.

×
Get Callback ?