Skip to main content Skip to search

नृसिंहवाडी

 कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी हे गाव आहे. यालाच नरसोबावाडी किंवा नरसोबाची वाडी असे म्हणतात.

श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीगुरु श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज औंदुंबर येथे होते ते स्थान सोडून श्रीगुरु अमरापूर या गावाजवळ आले. येथील संगमस्थानाजवळ आणि परिसरामध्ये त्यावेळी घनदाट जंगल होते. कोणीही तिकडे फिरकत नव्हते. तो एकांत परिसर श्रीगुरुंना फार आवडला. त्यांनी तेथे तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तपाहून अधिक काळ तपश्चर्या केली. येथील औदुंबर वृक्षाखाली असलेल्या त्यांच्या पादुकांमध्ये ते नित्य वास करुन आहेत. या पादुकांना मनोहर पादुका असे म्हटले जाते. येथील पादुका वालुकामय पाषाणाच्या आहेत. येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात अशी श्रद्धा आणि अनुभव आहेत. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी जागृत स्थान असून त्याला श्रीदत्तगुरुंची सुखाची राजधानी असे म्हटले आहे. हे दत्त उपासनेचे एक फार मोठे केंद्र आहे. पंचगंगा नदीमध्ये कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या पाच नद्यांचे पाणी आहे. पंचगंगेचा कृष्णेबरोबर येथे संगम होतो आणि मग ती पूढे कर्नाटकामध्ये वहात जाते. श्रीदत्तक्षेत्रांतील नृसिंहवाडी हे अतिशय प्रसिद्ध स्थान आहे. येथील कृष्णा नदीमध्ये शुक्ल, पापविनाशी, सिद्ध, अमर, कोटी, शक्ती, प्रयाग, संगम इ. आठ तिर्थे आहेत. याच ठिकाणी काशी विश्वेश्वराचा निवास असतो. तेथेच पलिकडच्या किनाऱ्यावर अमरापूर येथे ६४ योगिनीही राहतात. श्रीगुरु पश्चिम किनाऱ्यावर औदुंबर वृक्षाच्या किनाऱ्यावर रहात होते. दररोज माध्यान समयी ते अमरापूरला जाऊन अमरेश्वराचे दर्शन घेऊन भिक्षा घेऊन परत येत असत. श्रीगुरुंनी नृसिंहवाडी येथे अनेक अगम्य लीला केल्या. त्याच्या कथा श्रीगुरुचरित्रामध्ये आहेत. नृसिंहवाडी क्षेत्राचे महात्म्य अपार आहे. तेथील मनोहर पादुका या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत. त्यांचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होते. एक प्रकारचा वेगळाच आनंद मनामध्ये दाटून येतो. मनोहर पादूकांचे दर्शन होताना श्रीदत्तात्रेयांच्या सगुण पूजेचा मनोरम अविष्कार अनुभवता येतो. नृसिंहवाडी पूर्वेस कृष्णा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. त्यामुळे तिचे अद्वितीय महत्त्व आहे.नदीच्या पूर्व किनाऱ्यावर अमरेश्वराचे स्थान आहे. वाडीच्या दक्षिणेस पंचगंगा पश्चिमेकडून वाहात येऊन कृष्णेस मिळते. या संगम स्थानास फार मोठे पावित्र्य लाभले आहे, पावसाळ्यात या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहतात. मोठ्या पुरात श्रीदत्तगुरुंच्या पादुकांचे स्थानही बुडून जाते. संगमापूढे कुरुंदवाडच्या घाटासमोर डोह आहे, त्यामुळे संगमास रम्यता लाभली आहे. श्रीदत्तगुरुंच्या स्थानासमोर मोठे प्रशस्त घाट आहेत. त्यामुळे या स्थानाला भव्यता लाभली आहे. घाटावर छोटी मोठी काही मंदिरे आहेत, परंतु त्यांमध्ये श्रीगुरुंचे स्थान हे महत्त्वाचे आहे. श्रीभगवान श्री दत्तात्रेयाचे अवतार श्री नृसिंहसरस्वती यांनी ज्या औदुंबर वृक्षाखाली बारा वर्षे तपश्चर्या केली, त्याठिकाणी औदुंबराखालीच श्रींच्या पादुका स्थापन केल्या आहेत. श्रींच्या पादुका चंद्रकांत पाषाणाच्या असून त्यावर वज्र, अंकुश, ध्वज, कमल इ. दैवी चिन्हे आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष श्रीदत्तगुरुंचा निवास आहे.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीबद्दल श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) यांनी कुमार शिक्षा या ग्रंथात म्हटले आहे की-

           “ पुर्वी कृतयुगारंभी कश्यप, अत्री, इ. ऋषींना ‘ मी तुमचा पुत्र होईन ’ असा वर देऊन तो दत्तात्रेय परमेश्वर पृथ्वीतलावर अवतीर्ण झाला. पूर्वी झाला असेल तर असो, परंतु तो ईश्वर कृष्णा नदीच्या काठी नृसिंहवाटीका या गावामध्ये जागृत राहिला आहे. भक्तांचे अभीष्ट प्राप्त करुन देण्याच्या बाबतीत तो नृसिंह सरस्वती दत्त भगवान कधीच आळस करीत नाही. ”

         औदुंबर व श्रीदत्तगुरुंची भक्ती-सेवा करुन वर आल्यावर कट्ट्यावर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांचे स्मृति मंदिर आहे. त्याच्या मागे पिंपळाखाली श्रीहनुमानाचे मंदिर आहे. त्यामागे श्रीरामचंद्र योगी व मंडपाच्या पश्चिम बाजूस श्रीनारायण स्वामी यांचे समाधी-मंदिर आहे. येथेच श्रींची उत्सव मूर्ती असते. त्याला लागून उत्तरेस श्रीगोपाल स्वामी, श्रीगोविंद स्वामी इ. महापुरुषांच्या समाधी आहेत. ते सर्व श्रीदत्तगुरुंच्या सानिध्यात राहून भक्तांना आत्मोद्धारासाठी प्रेरणा देत असतात. साधना, उपासना व भक्ती यांसाठी नृसिंहवाडी हे क्षेत्र अत्यंत अनुकूल असल्यामुळे ते दत्तोपासनेसाठी प्रसिद्ध स्थान मानले जाते. म्हणूनच आजवर हजारो ज्ञात-अज्ञात, साधक उपासक येथे होऊन गेले आहेत.

×
Get Callback ?