Skip to main content Skip to search

पैजारवाडी

पैजारवाडी येथिल त्यांच्या समाधीजवळ आता कासवाकृती भव्य मंदिर उभे राहिले आहे. तेथे अत्यंत दिव्य वातावरण आहे. तेथे गेल्यावर विलक्षण अनुभूती येतात. त्यांना संगित आणि भजन प्रिय होते. ते भक्तांना अनेकदा चित्र विचित्र गोष्टी करायला सांगत असत. त्याचा अर्थ कुणालाही कळत नसे. त्यामुळे ते संभ्रमात पडत असत. पण त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळल्यावर भक्तांना विलक्षण अनुभूती येत असत. ‘ ॐ दत्त चिले ’ असा त्यांचा तारक मंत्र आहे. समाजातील गोरगरिब, श्रीमंत सर्व प्रकारचे भक्त त्यांचेजवळ येत असत. चिले महाराजांचा अवतार एक विलक्षण अवतार आहे. सर्वसामान्यांच्या आकलन शक्तींच्या पलिकडचे त्यांचे कार्य आःए. आजही श्रद्धाळू भक्तांना त्याची अनुभूती येते. त्यांचे जीवन कार्य पाहिल्यावर श्रीदत्तात्रेयांच्या सोळा अवतारापैकी “लीला विश्वंभर” या सहाव्या आणि “माया मुक्तावधूत” या दहाव्या आणि अकराव्या अवतारातील वर्णनाप्रमाणे त्यांचे कार्य होते याची खात्री पटते. त्यांच्या बाह्य आचरणावरून त्यांच्या अधिकाराची कल्पना कोणी करू शकणार नाही. पण जर निष्ठा ठेवून श्रद्धेने त्यांची सेवा केली तर मात्र प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. त्यांच्या आचरणाबद्दल, आहार विहाराबद्दल कितीही तर्क वितर्क केले तरी त्यांच्या अवतार दत्तात्रेयांचा अवतार होता याची खात्री पटते. पूर्ण ब्रह्मज्ञानी अवतारी पुरूष चारही आश्रमांच्या पलिकडे म्हणजे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या आश्रमांपलिकडे असतात असे सांगितले जाते. त्याला अत्याश्रमी असे म्हटले आहे. चिलेमहाराज अत्याश्रमी अवताराचे उदाहरण आहेत. त्यांना कोणत्याही आश्रमाचे नियम लागू होत नव्हते. त्यांच्या सर्व कृतींमध्ये गूढ अर्थ भरला होता. त्यांचे जीवन कार्य, लीला आणि चमत्कार त्यांच्या अवतारीत्वाचे साक्षी आहेत. त्यांचे निर्वाण ७ मे १९८६ रोजी पुणे येथे झाले. पण तरी आजही हजारो भक्तांना त्यांच्या कृपेची प्रचिती येत आहे. ते नेहमी म्हणत असत की आपली बॅटरी चार्ज करायला पहिजे. श्रीदत्तक्षेत्रांना भेटी देवून जणू आपण आपली बॅटरी चार्ज करीत आहोत.

अगदी अर्वाचीन काळात कोल्हापूर जवळपैजारवाडी येथे एक अवतारी पुरूष होवून गेले. त्यांचे नाव परब्रह्म सद्गुरु चिलेमहाराज. ते दत्तात्रेयांचे अवतार होते अशी श्रद्धा आहे. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी पन्हाळा किल्याजवळील जेऊर यागावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रय बाबा चिले आणि आईचे नाव मंजाबाई असे होते. कोल्हापूर मलकापूर रत्नागिरी रस्त्यावर बांबवडे गावाजवळ कोल्हापूर पासून २५ कि.मी वर पैजारवाडी हे गाव आहे. जन्मल्या बरोबर काही काळाने त्यांचे मातृछत्र हरपले. ते मॅट्रीकला होते. तेव्हा त्यांचे वडील निर्वतले. कोल्हापूरातील पंचगंगा नदीच्या घाटावर एका तीरावर सिद्धेश्वर समाधी आणि दुसऱ्या तीरावर पाटील बाबांची समाधी आहे. या पाटिलबाबा समाधीजवळ ते २५ दिवस अनुष्ठान आणि साधना करीत बसले होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलले. त्यांच्या जिवित काळामध्ये त्यांनी असंख्य लीला चमत्कार केले. त्यांचे बाह्यवर्तन अत्यंत बुचकळ्यात टाकणारे होते. ते प्रसंगी मद्यपान करीत आणि मांसाहार ही करीत. पैजारवाडी येथील गराडे महाराजांच्या समाधीवर ते मदिरेचा अभिषेक करीत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव त्यांना लगेच ओळखून येत असे. त्यांचे शंकर महाराजांशी सख्य होते. जणू शंकर महाराजांचा ते अवतार होते. शंकरमहाराजांप्रमाणे त्यांचा अवतार रुद्रावतार होता. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थां प्रमाणे ते काहीवेळा अत्यंत अपशब्द बोलित असत. पण त्यांचा उद्देश भक्तांचे पाप जाळणे हाच असे. त्यांच्या लीला विलक्षण होत्या. ते नित्य निसर्गातील सूक्ष्म गोष्टींबरोबर बोलत असत. त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते सत्य झाली आहेत. त्यांच्या भक्तांना त्यांनी अनेक संकटातून सोडविले आहे. अगदी मरण पावलेल्या व्यक्तींनाही त्यांनी जिवंत केले आहे. ते नेहमी मी दत्त आहे असे म्हणत असत. त्यांच्या भक्तांना त्यांनी दत्त स्वरूपात, विष्णू स्वरूपात, पांडुरंग रुपात दर्शन दिले आहे. त्यांचा पेहराव अतिशय साधा म्हणजे पांढरा शर्ट आणि विजार असा आहे. ते अनवाणी चालत असत. त्यांचा सतत संचार सुरु असे. प्रसंगी ते ३० ते ४० कि.मी. चालत जात असत. सर्व जाती धर्माचे लोक त्यांचे भक्त आणि शिष्य होते. त्यांच्या भक्तांच्या त्यांनी कठोर परीक्षा घेतल्या आहेत. शंकर महाराजांच्या रुपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले आहे.

×
Get Callback ?