Skip to main content Skip to search

शंकर महाराज मठ

वेश घेतला बावळा, अंतरी शुद्ध ज्ञानकळा I

ऐसा सदगुरू लाघवी, नाना रंगी जन खेळवी I      

बाल पिशाच्च उन्मत्त, लीला दावी तो विचित्र I

लुळा पांगळा जडमूढ, सांगेना अंतरीचे गूढ I

शंकरदासाचे लक्षण, तेथे राहे नारायण II

पुण्यातील स्वारगेट कडून कात्रज कडे जाणाऱ्या पुणेसातारा रस्त्यावर, स्वारगेट पासून सुमारे किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला एक मठ लागतो. हाच सदगुरु श्री शंकर महाराजांचा मठ होय.

आपल्या भारतवर्षाचे भाग्य थोर म्हणून या सिद्ध भूमीत आजवर अनेक ईश्वरतुल्य संत, सत्पुरुषांनी जन्म घेतला. त्याच परंपरेतील श्री शंकर महाराज हे एक सिद्ध आणि अवलिया पुरुष होते.अवधूत ह्या शब्दाची व्याख्या विचारात घेतली तर आपणास मनोमन पटते कि श्री शंकर महाराज एक अवधूत होते. अशा अवधुतांच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत. बाल अवस्था, उन्मनी अवस्था आणि पिशाच्च अवस्था. ह्या तीनही अवस्था स्वीकारणारे व जगणारे महान योगीराज म्हणजे सदगुरु श्री शंकर महाराज. मैं कैलास का रहनेवाला I मेरा नाम है शंकर II ह्या उक्तीतून स्वतः श्री शंकर महाराजांनी आपले मूळ स्थान व नाव आपणास सांगितले आहे. श्री शंकर महाराज नाथपंथीय होते, अवतार कार्यात ह्याची प्रचीती त्यांनी आपल्या भक्तांस पदोपदी दिली होती.

श्री शंकर महाराज……! एक अलौकिक, सिद्ध, महान योगी. त्यांचे व्यक्तिमत्वही गूढ, अनाकलनीय. त्यामुळे त्यांच्यासंबंधी विविधरंगी आख्यायिका ऐकावयास मिळतात. श्री शंकर महाराज यांचा जन्म कधी व कोठे झाला? त्यांचे गाव कोठले? मातापिता कोण? इत्यादी पुर्ववृताची विश्वसनीय व सुसंगत माहिती उपलब्ध नाही. अर्थात, सत्पुरुषांचे कार्य महान आणि अतिउच्च स्तरावरून चालत असल्याने या लौकिक व व्यावहारिक गोष्टींना फारसे महत्व नाही. संतपुरुष जनकल्याणा साठी प्रकट होतात आणि जनकल्याणा साठी सारे आयुष्य वेचतात. सिद्धपुरुषांच्या ठिकाणी अनेक ऋद्धीसिद्धी असल्याकारणे त्यांची जगावर पूर्ण सत्ता असते. आपले अवतार कार्य संपताच तेही निसर्ग नियमानुसार आपला देह विसर्जन करतात. परंतु त्या नंतरही त्यांचे लोकोद्धाराचे कार्य सुरूच असते.

 

श्री शंकर महाराजांच्या जन्माविषयी:

वर सांगितल्या प्रमाणे श्री शंकर महाराजांच्या जन्माविषयी माहिती ज्ञात नाही. तरी त्यांच्या भक्तां करवी जी माहिती मिळाली ती अशी: दैवीस्वप्नदृष्टांतानुसार श्री शंकर महाराज, जिल्हा – नाशिक, तालुका – सटाणा, गाव – अंतापूर येथील शिवभक्त दाम्पत्य श्री चिमणाजी व सौ पार्वती ह्यांना दावलमलिक पिराजवळील दाट जंगलात बाल अवस्थेत सापडले. शंकराच्या कृपाप्रसाद मुळे पुत्ररत्न प्राप्त झाल्या कारणे ह्या दत्तक आई-वडिलांनी बाळाचे नाव “शंकर” ठेवले. श्री चिमणाजी व सौ पार्वती ह्यांनी बाळ शंकराचे पोटच्या पोरापेक्षासुद्धा जास्त मायेने संगोपन केले. कोडकौतुक पुरवले. बाळ शंकर लहानपणापासूनच ध्यानात मग्न राहणारा, नामस्मरणात दंग होणारा, कीर्तन भजनात रमणारा शिवभक्त होता. पुढे त्यांनी ईश्वरी इच्छेनुसार अवतार कार्य पूर्ण करण्या करीता आई-वडिलांचा निरोप घेऊन अंतापूर सोडले.

 

श्री शंकर महाराजांची तपश्चर्या आणि तीर्थाटन:

दावलमलिक पिराचे दर्शन घेऊन बाळ शंकराने नाशिक येथील गोदावरीतीरा वरील श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच पुढे जाऊन त्याने सिद्धपीठ त्र्यंबकेश्वर येथील शिवशंकराचे दर्शन घेऊन पुढील तीर्थयात्रेस सुरवात केली. ह्या तीर्थयात्रेत बाळ शंकराने हरिद्वार, ऋषीकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, बद्रीनाथ, केदारनाथ ह्या तीर्थस्थानांचे दर्शन घेतले. त्या नंतर गुरुआज्ञेनुसार बाळ शंकराने केदारनाथ पासून थोडे दूर वासुकीताल सरोवराजवळील त्रीजुगीनारायण येथील गुहेत अनेक वर्षे तपश्चर्या केली. तदनंतर श्री शंकर महाराजांनी कैलास मानससरोवर येथील दर्शन घेऊन थेट प्रयाग येथे पोहोचले. प्रयाग येथील त्रिवेणी संगमात स्नान करून महाराज संपूर्ण भारत भ्रमणास निघाले. ह्या तीर्थाटनात महाराजांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रे, शक्तिपीठे, प्रसिद्ध मंदिरे, ज्योतिर्लिंगे, पवित्र नद्या व घाट यांस भेटी दिल्या. ह्या ठिकाणी महाराज बरीच वर्षे कधी गुप्त तर कधी प्रकट रूपाने आपले अवतार कार्य करीत होते, आणि अशाप्रकारे बाळशंकर, श्री शंकरमहाराज झाले. शेवटी आपल्या अवतारातील उत्तरार्धात ते आपल्या गुरूंच्या दर्शना करिता पौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोट येथे प्रकटले. श्री स्वामी समर्थांना वंदन करून पुढील अवतार कार्यासाठी आशीर्वाद प्राप्त केला. तेव्हा स्वामी स्मितहास्य करीत उदगरले “जा बाळा, तुला नेमून दिलेले कार्य पूर्णत्वास ने! आम्ही आहोतच तुझ्या पाठीशी!” तदनंतर समाधीस्त होई पर्यंत महाराज स्थूलरूपाने सोलापूर, पुणे, अहमदनगर, मुंबई, इत्यादी ठिकाणी तर सूक्ष्मरूपाने अवघ्या भूतलावर कार्यरत होते.

 

श्री शंकर महाराजांचे रुपवर्णन:

श्री शंकर महाराज अष्टवक्र होते. त्यांचा वर्ण सावळा असून उंची बेताची होती. डोळे टपोरे आणि हिऱ्या सारखे तेजस्वी होते. दाढी, मिशा, डोक्यावरील केस नेहमीच अस्ताव्यस्त असत. महाराज बऱ्याचदा उन्मनी किंवा बालभावत असत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बालाकाप्रमाणेच निरागस आणि बोल बोबडे होते. ते अजानबाहू म्हणजेच, त्यांचे हात गुडघ्या पर्यंत पोहचत. महाराज कधी धोतर-कुर्ता तर कधी सलवार-कुर्ता घालत. कधी सुटा-बुटात तर कधी एखाद्या राजा प्रमाणे भरजरी वस्त्रे परिधान करीत. कधी रेशमी पितांबर तर कधी दिगंबर अवस्थेत असत. ते हाताच्या बोटात अंगठ्या घालत. श्री शंकर महाराजांचे निस्सीम भक्त, श्री नानासाहेब मिरीकरांनी महाराजांचे रूपवर्णन करणारा अभंग रचला.

×
Get Callback ?